नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणताही नाही – अजित पवार

0
196

बारामती, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल. तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असा अंदाज एबीपी – सी व्होटर सर्व्हेने व्यक्त केला. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “अशा सर्व्हेंना काही अधिकार नसतो. विधानसभेच्या पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकाल काय लागले ते पाहा. कुठल्या भागात सर्व्हे झाला, त्यावर अंदाज लावला जातो. कुणी कितीही सर्व्हे केले तरी महायुतीमधील तीनही पक्ष त्याची काळजी घेऊ. आमच्या हातात आणखी वेळ आहे, महायुतीच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी आम्ही काम करू”, असे अजित पवार यांनी सांगितले.

“महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यासमोर विरोधकांकडे या पदासाठी कोण आहे? विरोधक जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल, तेव्हा जनता तुलना करेलच. माध्यमेही तुलना करतील. माध्यमाचे प्रतिनिधीही कुठले बटण दाबणार आहेत, याचे त्यांनीही आत्मपरिक्षण करावे. आतातरी देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणताही नाही”, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत केली. त्यात राज्य सरकारने सहा हजारांची भर घातली, असे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. देशाचे हित कुणाच्या हाती आहे, जागतिक पातळीवर देशाचे नेतृत्व करत असताना भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम कोण करू शकेल? असे अनेक मुद्दे पाहावे लागतात. केवळ एका विषयाचा विचार करून चालणार नाही. आताच आपण पाच राज्यातील निवडणुकांचा अंदाज घेतला. तीन राज्यातील जनतेने भाजपाला मतदान केले.”

“तेलंगणातही काय झाले आपण पाहिले. तिथले पुर्वाश्रमीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दैनिकात जाहिराती देत होते. मी हे केले, ते केले, असे सांगत होते. पण तरिही त्यांचाच एका मतदारसंघात पराभव झाला आणि राज्यातले सरकारही गेले. सर्व्हे अंदाज व्यक्त करतात, म्हणजे मतदारही त्याचप्रकारे विचार करतात असे नाही”, हे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बारामती येथे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत असताना आता इथून पुढे माझंच ऐका, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना काय बोलायचे, हा माझा अधिकार आहे. मी मतदारांना किंवा माध्यमांना काही बोललो नाही. माझ्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे, हा माझा अधिकार आहे. इतरांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.