नरेंद्र मोदींना रावणाची उपमा तर, उध्दव ठाकरे राम

0
120

नाशिक, दि. २३ (पीसीबी) – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटाकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोदी सरकार व भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना रावणाची उपमा देताना उद्धव ठाकरेंना रामाची उपमा दिली. प्रभू श्रीरामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंना संकटांचा सामना करावा लागत असल्याचं यावेळी ते म्हणाले.

“रामायण अयोध्येत कमी आणि पंचवटीत, महाराष्ट्रात जास्त घडलंय. प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे. मला तर वाटतंय की आता प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातात आता मशाल येईल. ते म्हणतात की भाजपामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. आम्ही आमच्या रामाला पुजतो, तुम्ही तुमच्या विष्णूची पूजा करा. पण रामाचं धैर्य विष्णूमध्ये नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

श्रीरामांप्रमाणेच उद्धव ठाकरे संकटकाळात संयमी असल्याचं राऊत म्हणाले. “प्रभू श्रीरामावर अन्याय झाला. तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील? पण राम शांत राहिला. संधीची वाट पाहात राहिला, जसे उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट पाहात आहेत. रामासमोर एका बाजूला राज्याभिषेकाची तयारी चालू असताना दुसरीकडे वनवासाकडे जाण्याचे निर्देश आले. रामाचा तो संयम मी उद्धव ठाकरेंमध्ये पाहातो. त्यामुळे रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेजी, वेट अँड वॉच. आपलीही वेळ येईल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“आज जागोजागी रावण दिसतात”
यावेळी संजय राऊतांनी नरेंद्र मोदींना रावणाची उपमा दिली. “तेव्हा एकच रावण होता. पण आज गेल्या काही वर्षांत जागोजागी रावणच दिसतात. दिल्लीतला रावण, महाराष्ट्रातला रावण, नाशिकमधला रावण. आपल्याला वाटतं की आजचा रावण अजिंक्य आहे. नाही. तेव्हाचा रावणही अजिंक्य नव्हता. ते डोक्यातून काढा. सध्याचा रावणही अजिंक्य नाही”, अशी टिप्पणी संजय राऊतांनी केली.

“हनुमानानं रावणाच्या सभेत त्याचा अपमान यासाठी केला कारण त्यांना रावणाचा आत्मविश्वास तोडायचा होता. शत्रूचा आत्मविश्वास तोडायचा असतो. कोण भाजपा, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे? रावणाचा आत्मविश्वास तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला”, असंही राऊत म्हणाले.

“रामात नेतृत्वगुण होते. रावणानं हनुमानाच्या शेपटाला आग लावली. शेपूट हनुमानाची, तेल रावणाचं, राज्य रावणाचं जळालं. याला म्हणतात नेतृत्वगुण. तुझ्या पैशानं तुझं राज्य जाळलं. माझं काही नाही जळालंय. तुझं जळालंय. माझी शेपूट सुरक्षित आहे. वाघ सुरक्षित आहे, वाघाचे बछडेही सुरक्षित आहेत, हनुमान सुरक्षित आहे. याला म्हणतात नेतृ्त्व”, असा टोलाही संजय राऊतांनी भाषणात लगावला.