नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात ११ वर्षानी निकाल, दोघांना जन्मठेप

0
154

पुण्यातील विशेष न्यायालयाकडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात प्रकरणात ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोप होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉ. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, विशेष न्यायाधीशांनी निकालात म्हटले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

आरोपी क्र. १ वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष सोडले आहे. आरोपी संजीव पुनाळेकर यांनी मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. विक्रम भावे यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी क्र. २ आणि ३ अनुक्रमे शरद कळसकर आणि सचिन अंदूरे यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणखी वाढणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (र. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावह गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.