नराधम पतीने पत्नीला जाळून ठार मारले, राख समुद्रात फेकली

0
347

– आरोपी शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंतला बेड्या

रत्नागिरी, दि. १३ (पीसीबी) : रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंत उर्फ भाई सावंत याला हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या पत्नीला जाळून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सावंतने तिच्या मृतदेहाची राख समुद्रात टाकल्याचा आरोप आहे. रत्नागिरी पंचायत समितीची माजी सभापती राहिलेल्या स्वप्नाली सावंत दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सुरुवातीपासून पतीने तिच्यासोबत घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

४७ वर्षीय सुकांत व्यतिरिक्त त्याचे दोन साथीदार रुपेश उर्फ छोटा सावंत (४३) आणि प्रमोद उर्फ पम्या गवनांग (३३) यांना देखील खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली. रविवारी या तिघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. धक्कादायक म्हणजे भाई सावंतने पत्नीला जाळण्यासाठी रोज थोडे थोडे पेट्रोल जमा केल्याचीही माहिती समोर आली आहे.
मयत स्वप्नाली सावंत (३५) या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. कौटुंबिक कलहातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री (३१ ऑगस्ट) सुकांतच्या मालकीच्या चाळीत तिघा आरोपींनी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यांनी तिची राख समुद्रात फेकून दिली, असे रत्नागिरीचे एसपी मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले. घटनास्थळाची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. या गुन्ह्यानंतर शिवसेनेचा रत्नागिरी उपशहरप्रमुख सुकांत सावंत याने निर्दोष असल्याचं भासवत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

मात्र, 10 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांची आई संगीता शिर्के (६४) यांनी सुकांतला भेटून तिच्या बेपत्ता होण्याशी तुमचा काही संबंध आहे का, असे विचारले असता, त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. “बेपत्ता मुलीवरुन संगीता शिर्केंचा जावयाशी वाद झाला आणि सुकांतने स्वप्नाली यांची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर संगीता यांनी पोलिसांत तक्रार केली, ज्यामुळे सुकांत आणि इतर दोघांना अटक करण्यात आली” असे एसपींनी सांगितले.