नरभक्षक बिबट्याच्या पोटात मानवी अंश आढळल्यास ठार मारणार

0
13

मंचर, दि. ४ – गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. या बिबट्याने गेल्या महिनाभरात दोन लहान मुले आणि एक वृद्ध महिला अशा तिघांच्या नरडीचा घोट घेऊन त्यांना ठार केले होते. त्यामुळे वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला (Leopard) गोळी मारुन ठार करण्याचे आदेश दिले होते. वनविभाग आणि काही खासगी संस्थांनी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास 11 पिंजरे लावले होते. यापैकी मंचर येथे एका पिंजऱ्यात एक बिबट्या सापडला आहे. मात्र, हाच बिबट्या नरभक्षक आहे किंवा नाही, याची अद्याप खातरजमा झालेली नाही. या बिबट्याच्या शरीरात मानवी अंश आहे की नाही, हे आता तपासले जाईल. त्यानंतर हा बिबट्या नरभक्षक असल्यास त्याला ठार करायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.


गेल्या काही दिवसांमध्ये नरभक्षक बिबट्याने तिघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला होता. यावेळी जाळपोळही करण्यात आली होती. तब्बल 16 तासांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने समजूत काढल्यानंतर सोमवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास नागरिकांना रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. वनविभागानेही नागरिकांच्या 11 मागण्या मान्य केल्या होत्या. यानंतर दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लहान मुलाच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि खासगी संस्थांनी ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. बिबट्यांचे मानवावरील वाढते हल्ले, हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण्यांनी बिबटे वाचवायचे की माणसं वाचवायची, हे सरकारने ठरवा अशी भूमिका घेतली आहे. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शिरुर तालुक्यातील पिंपळखेड तालुक्यात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वनविभागाचे पथकही दाखल झाले होते. या परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर अशा चार तालुक्यांमध्ये जवळपास 1200 बिबटे असल्याचे सांगितले जाते. 10 चौरस किलोमीटर क्षेत्रात एकतरी बिबट्या असल्याची माहिती येथील वनविभागाच्या प्रमुखांनी दिली होती. गेल्या महिनाभरात बिबट्याने तीन जणांचे जीव घेतल्याने त्यांना ठार करण्यासाठीचा वनविभागावरील दबाव वाढत आहे.

दरम्यान, मंगळवारी वनमंत्री मंत्रालयात बैठक घेणार आहे. या बैठकीत बिबट्यांवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तीन जणांचा मृत्यू होऊनही पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यानं आजच्या मंत्रालयातील बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.