दि . २५ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड मनपा कडून मुळा नदी पात्रात सुरु असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मानवी साखळी आंदोलन केले. मनपा भवनासमोर रविवारी (२५ मे) सकाळी हे आंदोलन झाले. प्रथम नदी स्वच्छ करा आणि अवैध वृक्षतोड थांबवा, अशी मागणी करणारे बॅनर घेऊन सर्वांनी नदी सुधार प्रकल्पाचा विरोध केला.
नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात मागील काही महिन्यांपासून आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी नदी सुधार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे हे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे काम तात्पुरत्या स्वरूपात न थांबवता पूर्णपणे थांबवून प्रथम नदीतील पाणी शुद्ध करण्यास प्राधान्य देण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच नदीत टाकला जाणारा भराव काढून घ्यावा, निळ्या पूररेषेच्या आतमध्ये केलेले बांधकाम हटवावे. सुशोभीकरणाच्या नावाखाली होणारी अवैध वृक्षतोड थांबवावी, अशा मागण्या नागरिक करत आहेत.
नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात रविवारी आठवे आंदोलन झाले. मनपा भवनासमोरील हे दुसरे आंदोलन आहे. २४ एप्रिल रोजी मनपा भवनासमोर पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले. यापूर्वी नदीत उतरून आंदोलने करण्यात आली. नागरिकांमधून या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून प्रशासनाने तात्काळ हे कायमस्वरूपी थांबवावे, अशी मागणी केली जात असून यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविवारी झालेल्या मानवी साखळी आंदोलनाच्या वेळी देण्यात आला.