मुळा नदीवरील प्रस्तावित नदीकाठ विकास (RFD) प्रकल्पासंदर्भात (विशेषतः वाकड-सांगवी भागातील) नागरिकांच्या तक्रारी व चिंता मांडण्यासाठी नागरिकांनी पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) येथील अधिकारी व सल्लागारांबरोबर बैठक घेतली. या चर्चेत HCP सल्लागार पथकाचाही सहभाग होता.
या बैठकीत नदीकाठच्या वाकड-सांगवी पट्ट्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांच्या संरक्षणाबद्दल चर्चा करण्यात आली. नागरिकांनी भूजल पुनर्भरण, जैवविविधतेचे संवर्धन तसेच नदीच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी या क्षेत्रांचे असलेले पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या संरक्षणाची गरज स्पष्ट केली. नदीकाठची वनराई, तसेच पक्ष्यांचे, कासवांचे अधिवास यांचे रक्षण होण्यावर नागरिकांनी भर दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मुद्द्यांची दखल घेत नदीकाठावरील विकासाचे नियोजन करताना समृद्ध नदीपरिसंस्थांचे संवर्धन करणे आवश्यक आहे हे मान्य केले. अशा क्षेत्रांच्या संरक्षणासाठी उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच मुळा नदीच्या काठावरील परिसंस्थांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नागरिकांशी व तज्ज्ञांशी संवाद साधणार असे सांगितले.
या बैठकीतून नदीकाठ विकासाच्या नियोजनात लोकसहभाग आणि पर्यावरणीय समतोल यांचा समन्वय साधणाऱ्या सहयोगी दृष्टिकोनाची गरज अधोरेखित झाली. या बैठकीस PCMCचे मुख्य अभियंता श्री. संजय कुलकर्णी, JICAचे अभियंते, HCP सल्लागार, तसेच शैलजा देशपांडे, अजय फाटक, हृषिकेश तपशाळकर, शुभम पांडे, प्राची चोपडे आणि प्राजक्ता महाजन असे नदीप्रेमी नागरिक उपस्थित होते.









































