नदी टिकली तर संस्कृती टिकेल – सचिन काळभोर

0
336

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – “नदी टिकली तर संस्कृती टिकेल!” असे मत कृतिशील पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि संस्कारभारतीचे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवारी (दि.2) समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) आयोजित ‘साहित्य संवाद’ या उपक्रमांतर्गत त्यांनी आपले अनुभव कथन केले. पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष कैलास भैरट यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच शहरातील अनेक साहित्यिकांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.

सचिन काळभोर पुढे म्हणाले की, “नदीच्या काठावर वस्ती करून मानवी संस्कृतीचा प्रारंभ झाला आहे; पण निर्माल्य साठविण्याचे, सांडपाणी सोडण्याचे साधन म्हणून नदीपात्राचा वापर केला जातो. सांडपाण्यातील घातक रसायनांमुळे पाण्यातील जैवविविधता जवळपास नामशेष झालेली आहे. संतसाहित्यापासून बोध घेऊन समाज आणि शासन यांच्या एकत्रित योगदानातून जलप्रदूषण रोखून जिवंत जलस्रोत पुनरुज्जीवित केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जन्माला येणाऱ्या प्रत्येक अर्भकासोबत त्या कुटुंबाला किमान एक देशी रोप दत्तक दिले पाहिजे; कारण निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे!” त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे लिखित ‘अरण्येश्वरी’ या ललितसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

अरविंद दोडे यांनी आपल्या मनोगतातून, “वैफल्यग्रस्त जीवनामुळे वज्रेश्वरीच्या निसर्गसान्निध्यात राहिल्याने ऋग्वेदातील ऋचा या निसर्गाशी संबंधित आहेत याची अनुभूती आली अन् त्यातून गद्य-पद्य आकृतिबंधातील ‘अरण्येश्वरी’ या ललितबंधांचे लेखन झाले!” अशा शब्दांतून आपली लेखनप्रक्रिया मांडली. अध्यक्षीय मनोगतातून गिरीश प्रभुणे यांनी, “भारतीय संस्कृती ही पूर्णत्वाकडे जाणारी असून वेद, उपनिषदे यांचा जन्म निसर्गातच झाला आहे. ‘अरण्येश्वरी’ ही निसर्गप्रेमाची अनोखी कहाणी आहे!” असे विचार मांडले.

कार्यक्रमाच्या दरम्यान ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहावर वर्षभर नियमितपणे विषयानुरूप लेखन करणाऱ्या अशोकमहाराज गोरे (वेदावतार तुकोबा), पुरुषोत्तम सदाफुले (विचारविस्तार), सुभाष चव्हाण (महाराष्ट्रातील गडकिल्ले), प्रदीप गांधलीकर (दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त सिनेकलावंत), डॉ. पी. एस. आगरवाल (लेखक एक स्वप्न अनेक), श्रीकांत चौगुले (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष) आणि अभिवाचक शोभा जोशी यांना सन्मानित करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) उपाध्यक्ष सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला केळकर, जयश्री श्रीखंडे, समृद्धी सुर्वे, विनोद चटप, नीलेश शेंबेकर, नितीन हिरवे यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.