पिंपरी, दि. १४ – पिंपळे निलख स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या नदीकाठच्या कामाबाबत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आक्षेप आणि तक्रारींची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे ‘नदी बचाव आंदोलन’ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे थोडे का होईना चीज झाले आहे.
मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वाकड बायपास ते सांगवी पूलदरम्यान नदीकाठ सुशोभीकरणासाठी बांधकाम सुरू आहे. हे प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविले जात आहेत. संबंधित कामासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला होता.
तथापि, पिंपळे निलख येथील स्मशानभूमीजवळील कामाबाबत नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांनी नदीमध्ये टाकला जाणारा भराव आणि नदीकिनारी होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत चिंता व्यक्त केली होती. परिणामी या भागातील कामाचा फेरविचार करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीकडून नव्याने अहवाल मागवला आहे.
महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी १४ मे रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, पिंपळे निलख स्मशानभूमी जवळील साखळी ६+१०० ते साखळी ६+५०० या भागातील काम तात्पुरते थांबविण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या संदर्भात “नदी बचाव आंदोलन” सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, “नदीचे स्वरूप टिकवण्यासाठी आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. महापालिकेने आमच्या मागणीकडे लक्ष दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.”
या निर्णयामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यातील संवादाला चालना मिळण्याची शक्यता असून, भविष्यातील कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे