नगराध्यक्ष आणि सरपंच कशाला, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा..

0
277

बारामती, दि. १६ (पीसीबी) : नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.“जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा,” असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज शिंदे सरकारवर केला. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते.

नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले, “या प्रश्नाबाबत दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते.सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील तर काय होते याचा अनुभव या पूर्वी घेतला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाही घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे असेच लोक निवडणूक जिंकू शकतात,”
पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये काही परंपरा असतात, 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते, बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात, राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात त्याच पध्दतीने याही निवडी होत होत्या, तशाच पध्दतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते,”
“विधीमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करुन ज्या सूचना येतील त्यांचा विचार करुन मगच हा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही,” असे पवार म्हणाले.
“कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिला या बाबत आपले दुमत नाही, पण निवडणूकीचा मोठा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाहीत, त्यांना खर्चच झेपणार नसेल तर मग शासन निवडणूका थांबवणार का,” असा सवाल अजित पवार यांनी केला.
“शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार का, यावर अजित पवार म्हणाले, “अंतिम निर्णय शरद पवार व उध्दव ठाकरे हे घेतील, ते दोघे जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करु,”