नगरसेवक वडिलांच्या थोबाडीत मारल्याचा बदला म्हणून मुलाने सुपारी देऊन केला किशोर आवारेंचा खून

0
426

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा ता.१२ मे रोजी भरदिवसा तळेगावात निर्घृण खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच समितीचा माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव याने सुपारी देऊन केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. 

भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात तळेगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर एका कामावरून डिसेंबरमध्ये वाद झाला होता. त्यातून आवारेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. सर्वांसमोर मारल्याने वडिलांचा अपमान झाल्याने चिडलेल्या गौरवने या अपमानाचा बदला; म्हणून आवारेंचा सुपारी देऊन खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, असे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांनी सांगितले.

दरम्यान, शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप ऊर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 32, रा. आकुर्डी) या मारेकऱ्यांना पोलिसांनी हत्येच्या रात्रीच पकडले. त्यांना २० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने शनिवारी दिला. या चौघांना पळून जाण्यास मदत करणारा श्रीनिवास उर्फ सिनू व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) याला आणि गौरव याला शनिवारी अटक करण्यात आली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, आवारेंचा खून हा पूर्वववैमनस्यातून सुपारी देऊन झाल्याचे समजल्याने ती राजकारणातून झाल्याच्या शक्यतेला आता छेद बसला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्थानिक आमदार सुनील शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी राजकीय वैमनस्यातून कट करून आपल्या मुलाला (किशोर आवारे) मारले असल्याची तक्रार तळेगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि गुन्ह्यातील फिर्यादी सुलोचना आवारे यांनी पोलिसांत दिली होती. त्या तक्रारीनुसार या दोघा शेळके बंधूंना या खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले होते. मात्र, आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे स्पष्टीकरण आमदार शेळके यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिले होते.

दुसरीकडे, शेळके बंधूंना अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी आवारे समर्थक व त्यातही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन मोठा आक्रोश केला होता. तर, शेळकेंना या गुन्ह्यात निष्कारण गोवल्याने त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थकही आज सकाळी प्रतिमोर्चा काढणार होते. पण, कायदा व सुव्यस्थेचे कारण देत पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही त्यांच्या समर्थकांनी सकाळीच शेळकेंच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे.