नगरसेवक, महापौर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा तीस वर्षांचा प्रवास

0
51

नागपूर, दि. 04 (पीसीबी) : मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री असे सर्व महत्वाचे पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून फडणवीस यांची निवड झाल्याने तेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. नागपूर महापालिकेतील नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री अशी त्यांची जाज्वल राजकीय कारकीर्द आहे.

फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.

फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी पहिल्यांदा नागपूर महापालिका निवडणूक राम नगर प्रभागातून जिंकली. १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते. त्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले. १९९९ पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.

२०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ते ठरले. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण काहीच दिवस टिकले.

उच्चविद्याविभूषित
देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या नागपुरातील इंदिरा कॉन्व्हेंटमधून झाले. त्यानंतर त्यांनी शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात आणि धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून १९९२ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि डीसीई, बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रात पदविका प्राप्त केली आहे.

भूषलेली पदे
१)मुख्यमंत्री
२)विरोधीपक्ष नेते
३)उपमुख्यमंत्री
४) नागपूरचे महापौर
५)नगरसेवक

पक्ष संघटनेतील सहभाग
१) प्रभाग अध्यक्ष, भाजयुमो
२) पदाधिकारी, नागपूर (पश्चिम) भाजपा
३)नागपूर अध्यक्ष, भाजयुमो
४)प्रदेशाध्यक्ष-भाजप