गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश असून ही चकमक छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या कांकेर, नारायणपूर आणि गडचिरोली या नक्षल्यांच्या ‘ट्राय जंक्शन’मध्ये घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे बेटिया पोलीस हद्दीतील जंगल परिसरात मोठी नक्षल कारवाई सुरू असल्याची गुप्त माहिती छत्तीसगड पोलिसांना १६ एप्रिल रोजी मिळाली. बीएसएफ आणि कांकेर जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना दुपारी त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरराव हा देखील ठार झाला. तीन जवान जखमी झाले.