“ध्येय निश्चित करून वाटचाल करा!” – उमा खापरे

0
230

पिंपरी,दि. १५ (पीसीबी)- “आत्तापासून ध्येय निश्चित करून वाटचाल करा!” असा कानमंत्र नवनिर्वाचित विधान परिषद आमदार उमा खापरे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १४ जुलै २०२२ रोजी विद्यार्थ्यांना दिला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा) यांच्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उमा खापरे बोलत होत्या.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, ब्रह्मोद्योगचे उपाध्यक्ष राजन बुडुख, प्रमुख सल्लागार पुष्कराज गोवर्धन, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष महेश बारसावडे, इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्ष मुक्ती पानसे, माजी उपमहापौर नगरसेविका शैलजा मोरे, अश्विनी चिंचवडे यांची व्यासपीठावर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. यावेळी मंचक इप्पर यांनी, “पालकांनी यशापयशाच्या तराजूत मुलांना न तोलता त्यांच्यातील सुप्तगुणांचा शोध घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडू द्यावे. फक्त डॉक्टर, इंजिनिअर हेच उत्तम करिअर असते असे नाही तर अनेक क्षेत्रांत करिअरच्या असंख्य वाटा आहेत. योग्य वयात मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास त्यांच्यातील नैसर्गिक गुणवत्ता आणि आवडीनुसार ते कारकिर्दीत उज्ज्वल यश मिळवू शकतात!” असे विचार मांडले.

गोविंद कुलकर्णी यांनी, “अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या चळवळीचा उदय सोळा वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातून झाला असून सतरा राज्यांमध्ये संघटना कार्यरत आहे. आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये ब्राह्मण युवक अग्रेसर राहिला पाहिजे हेच चळवळीचे उद्दिष्ट आहे!” अशी माहिती दिली. याप्रसंगी उमा खापरे यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल तसेच निगडी प्राधिकरणतील तन्मयी देसाई या विद्यार्थिनीने युपीएससी परीक्षेत देशात २२३वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पार्थ कुलकर्णी, पूजा दीक्षित, अनुजा कुलकर्णी, कौशिक आष्टीकर, ओम शेंडे आणि हर्षा अग्निहोत्री या विद्यार्थ्यांना महासंघाच्या वतीने प्रत्येकी रुपये ५०००/- (रुपये पाच हजार फक्त) शिष्यवृत्ती जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्याचे धनादेश विद्यार्थ्यांना सुपुर्द केले. याशिवाय आर्थिक हालाखीची परिस्थिती असलेल्या एका विद्यार्थ्याचा एका वर्षाचा संपूर्ण खर्च महासंघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून अकरा भाग्यवान गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले; तसेच दहावी आणि बारावीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. सचिन बोधनी, अतुल इनामदार, मंदार कुलकर्णी, सुषमा वैद्य, वृंदा गोसावी, मकरंद कुलकर्णी, श्यामकांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, कार्तिक गोवर्धन, भाऊ कुलकर्णी, प्रवीण कुरबेट, शशिकांत कुलकर्णी, सिद्धांत चौधरी, आनंद देशमुख आणि इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी संयोजनात सहकार्य केले. नरेंद्र चिपळूणकर आणि मंजिरी सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल कुलकर्णी यांनी आभार मानले. मंत्रपुष्पांजलीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.