पिंपरी, दि.१६ (पीसीबी) : “उत्कट ध्यासातूनच उद्योजक होता येते!” असे प्रतिपादन अजय मुंडे यांनी शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी केले. महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मला उद्योजक व्हायचंय!’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना अजय मुंडे बोलत होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, उद्योजक आबा नागरगोजे, केंद्रीय अन्वेषण विभागाचे विधिज्ञ ॲड. विजय ढाकणे, कामगारनेते किशोर सोमवंशी, व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, भगवान शंकर आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेची आणि शिवशंभो फाउंडेशनच्या एकवीस वर्षे कालावधीतील विविध उपक्रमांची माहिती दिली. अजय मुंडे पुढे म्हणाले की, “पूर्वीच्या काळी करिअरच्या मोजक्याच क्षेत्रांत संधी उपलब्ध होत्या. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक क्षेत्रांत व्यवसाय अन् नोकरी सहज मिळायची; परंतु आता अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन नोकरी मिळण्याची शाश्वती फक्त एक टक्का आहे.
व्यावसायिक सेवा प्रदान करणारे, पारंपरिक व्यापारी आणि नवीन वस्तूंची निर्मिती करणारे असे उद्योजकांचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार आहेत. उद्योजक होण्यासाठी वयाची कोणतीही अट नसली तरी कमी वयात चुकांची दुरुस्ती अन् जोखीम स्वीकारण्याची क्षमता जास्त असते. त्यासाठी मनाचा निर्धार हीच योग्य वेळ असते. कोणताही व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागतो. ग्राहक हा राजा ही भावना, नावीन्यपूर्ण कल्पना, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास, आत्मविश्वासाने भीतीवर मात, काळाबरोबर बदलण्याची वृत्ती आणि वेड लागल्याप्रमाणे उत्कट ध्यास घेतल्याशिवाय उद्योजक होता येत नाही!
” टाटा उद्योगसमूहाची एका उद्योगातून अनेक उद्योग निर्माण करण्याची व्यवसायनीती, कंपनीत नोकरी करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छतेच्या क्षेत्रात उद्योगाची शोधलेली संधी, हजामत अन् दाढी करणे या दैनंदिन पण उपेक्षित प्रकारातून व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी, महिलांना प्रपंच सांभाळून जोडव्यवसाय करण्याची कल्पना अशा अनेक उदाहरणांवरून अजय मुंडे यांनी सहज, सोप्या शैलीतून उद्योजक होण्याचे मार्ग कथन केले.
व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी श्रोत्यांमधील तरुणाईला प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप केले. राजेश हजारे, काळुराम साकोरे, ॲड. रूपाली तोरखडे, संतोष रांजणे, दत्तात्रय भुसे, विद्याधर राणे, संजय देशमुख यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.