धोकादायकपणे गॅस चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा

0
216

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – धोकादायकपणे एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १३) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास गायत्री गॅस सर्व्हिस आणि संस्कृती गॅस सर्व्हिस या दोन दुकानांमध्ये करण्यात आली.

नितीन मोहन वाघमारे (वय ३६, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धनराज देविदास बिरादार आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार फारुख मुल्ला यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि आरोपी धनराज हे दोघे संस्कृती गॅस सर्व्हिस या दुकानात रिकाम्या सिलेंडर मध्ये भरलेल्या सिलेंडर मधून गॅस काढत होते. तर आरोपी नितीन वाघमारे हा गायत्री गॅस सर्व्हिस या दुकानात भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत होता. यावेळी आरोपींनी कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नव्हती. तसेच याबाबत त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना त्यांनी गॅस काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.