पिंपरी, दि. २० (पीसीबी) : धुळे येथून तस्करी करून आणलेला गांजा पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्थांच्या आवारात विकणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 33 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी (वय 36, रा. म्हाळुंगे, पुणे. मूळ रा. चित्रकुट, ता. श्रीरामपुर, जि. चित्रकुट धाम करवी, उत्तरप्रदेश), अशोक गुलाबचंद पावरा (वय 19), पवन सानु पावरा (वय 19, दोघे रा. मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता. शिरपुर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल शेटे आणि मयुर वाडकर यांना तीनजण संशयास्पदरित्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 16 किलो 104 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाइल फोन असा नऊ लाख 50 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपींकडे केलेल्या चौकशीत आणखी 17 किलो 009 ग्रॅम वजनाचा आठ लाख 50 हजार 450 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 33 किलो वजनाचा 18 लाख 650 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार मयुर वाडकर, निखिल शेटे, प्रदिप शेलार, किशोर परदेशी, शिल्पा कांबळे, निखिल वर्षे, राजेंद्र बांबळे, गणेश कर्पे, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे, गोविंद डोके, पांडुरंग फुंदे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने केली.










































