पिंपरी – धुलीवंदनाच्या दिवशी निगडी प्राधिकरणातील सावरकर उद्यानात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करून अस्वच्छता दंड वसूल करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नंदकुमार सातुर्डेकर यांनी केली आहे.
यासंदर्भात सातुर्डेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरणातील सेक्टर नंबर 26 येथे महापालिकेने गणेश तलावामध्ये सावरकर उद्यान विकसित केले आहे. या ठिकाणी अनेक आबालवृद्ध व्यायामासाठी तसेच मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात येत असतात. मात्र या उद्यानासमोरील पटांगण विविध खाजगी संस्था विविध कार्यक्रमांसाठी वापरत आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या उद्यान विभागाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही.
शुक्रवारी धुलीवंदन सणाच्या निमित्ताने प्राधिकरणातील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी या उद्यानातील पटांगणात रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांमध्ये अल्पोपहार देण्यासाठी वापरलेल्या डिश आणि पाण्याच्या बिसलेरी बाटल्या व्यायामासाठी लावलेल्या साहित्याच्या ठिकाणी तशाच टाकून देण्यात आल्या.
शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून महापालिका अस्वच्छता दंडाबद्दल पाच हजार रुपये दंड वसूल करते. मग हाच नियम सावरकर उद्यानात अस्वच्छता करणाऱ्या त्या दोन पदाधिकारी आणि उद्यानात अस्वच्छता करणाऱ्यांना लावणार का? या मंडळींकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करणार का? असा सवाल सातुर्डेकर यांनी केला आहे. या प्रकरणी लक्ष घालून आयोजकांकडून दंड वसूल करावा तसेच महापालिकेचे सदरचे उद्यान सुस्थितीत राहावे यासाठी
उद्यानाची, त्यालगतची पटांगणाची जागा महापालिकेने यापुढे कोणालाही वापरासाठी देऊ नये. अन्यथा कार्यकर्ता म्हणून या विरोधात आवाज उठवावा लागेल. असा इशारा सातुर्डेकर यांनी दिला आहे.