धारावी पुनर्विकास प्रकल्पावर ठाकरे बंधूंचा विरोध; सर्वपक्षीय जाहीर सभेत राजकीय तापमान वाढण्याची शक्यता

0
2

दि.०१(पीसीबी)-आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला केंद्र करून मुंबईत राजकारण तापू लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पावर तीव्र टीका केली असून, धारावीतील कामराज स्कूल मैदानात ७ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकार आणि अदानी समूहसमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण होऊ शकते.

धारावी बचाव समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सभेत मुख्य उद्देश अदानी समूहाच्या सर्वेक्षणातील त्रुटींचा विरोध करणे हा आहे. समितीच्या मते, पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक जुन्या आणि पात्र रहिवाशांना डावलले जात आहे, ज्यामुळे त्यांचे हक्काचे घर गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

सरकार या प्रकल्पाद्वारे धारावीच्या ६०० एकर जागेचे चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करत असून, अदानी समूहाच्या कंपनीला संपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. या योजनेंतर्गत पात्र झोपडीधारकांना ४०५ चौरस फुटांचे मोफत घर देण्याचा दावा केला जात आहे, मात्र स्थानिक रहिवाश आणि विरोधक किमान ५०० चौरस फुटांचे घर मिळावे, अशी मागणी करत आहेत.


उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे की, अदानी समूहाला प्रकल्पातून प्रचंड आर्थिक फायदा होईल, त्यामुळे नियम बदलून TDR घोटाळ्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक पात्र आणि जुने रहिवाश सर्वेक्षणातून जाणूनबुजून वगळले जात आहेत, .या परिस्थितीमुळे धारावीचा मुद्दा मुंबईतील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय व्यासपीठावर ठाकरे बंधूंची उपस्थिती या प्रकल्पाविरोधात एकसंध संदेश देणार असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.