दिघी, दि. 06 (पीसीबी) : धारदार शस्त्राने वार करत कामगाराचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास काळेवाडी चऱ्होली येथे घडली. सचिनकुमार लखीदर राय (वय २३, रा. काळेवाडी चऱ्होली. मूळ रा. बिहार) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक रहाणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनकुमार हा टेल्को कंपनीमध्ये कंत्राटी कामगार होता. पूर्वी तो भोसरी येथे राहण्यास होता. एक महिन्यापूर्वी तो काळेवाडी चऱ्होली येथे राहण्यास आला होता. गुरुवारी सायंकाळी दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सचिनकुमार याचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.