बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य पेटून उठलं. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सुरुवातीपासूनच आक्रमक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुरेश धस हे सुरुवातीपासूनच या प्रकरणी सातत्याने आवाज उठवत आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, अखेर ही बातमी बाहेर आली आणि स्वत: सुरेश धस आणि भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर शिक्कामोर्तब केलं. या भेटीवर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपली पहिरली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट जरी झाली असली तरी ते या लढ्यात ते आपल्यासोबत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
सुरेश धस यांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. अण्णांची भूमिका कायम आहे, त्यासाठी ते पुरावे देत आहेत, लढत आहेत. सातत्त्याने पाठपुरावा करत आहेत. आरोपींना फाशी मिळेपर्यंत सुरेश धस याच भूमिकेत असतील. जेव्हा सुरेश धस यांची भेट होईल तेव्हा त्यांच्याशी या भेटीबाबत चर्चा करेन. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की ते संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत नेहमी असतील. त्यामुळे मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्यांनी ते स्पष्ट केलं आहे आणि आम्हालाही तिच अपेक्षा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.