‘धर्म म्हणजे पूजा नाही. हे खा ते खा, हे खाऊ नका, शिवू नका म्हणजे धर्म नाही

0
84

पुणे, दि. १० –
‘धर्म म्हणजे पूजा नाही. हे खा ते खा, हे खाऊ नका, शिवू नका म्हणजे धर्म नाही. धर्माची मूल्ये सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या यातून आली आहेत,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन ही विशिष्ट प्रकारचा ग्रंथ मानणारी आणि विशिष्ट विचार करणारी नावे आहेत. हिंदू हे एकतेच्या धाग्यातून एका विचाराने जगणारे आणि सर्वांना स्वीकारणारे उदात्त विशेषण आहे,’ अशी व्याख्या त्यांनी केली.

साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीने डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला तंजावर येथील गायत्रीराजे भोसले, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते. तंजावर येथील बाबाजीराजे भोसले छत्रपती अध्यक्षस्थानी होते.

‘हा देश चिरंजीव आहे. जग भटकले तर आपण जरा इकडे तिकडे होऊ; पण पुन्हा मूळ मार्गावर येऊ. सत्ययुगापासून आत्तापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा आहे. स्वतःला काँग्रेसमधील डावे म्हणवणारे सुभाषचंद्र बोस याला स्पष्टपणे हिंदू प्रेरणा म्हणत. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही तर विविधतेला स्वीकारणारे ते उदात्त विशेषण आहे. हा देश इतर देशांप्रमाणे तगण्यासाठी किंवा जगण्याच्या सुरक्षिततेसाठी निर्माण झालेला नाही. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी राष्ट्राची निर्मिती झाली आहे. भारतवर्ष एक राहिला याचे कारण हिंदू धर्मात आहे,’ असे भागवत यांनी सांगितले.