दि . १२ ( पीसीबी ) – धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. सासरच्या लोकांकडून धर्मांतरासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. मृत महिलेच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर हा गंभीर आरोप केलेला आहे. त्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांना अटक केलेली आहे.
ऋतुजा राजगे असं या मयत महिलेचं नाव आहे. सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात असल्याचा आरोप आहे. 6 जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर वारंवार सक्ती करण्यात येत होती, असा आरोप ऋतुजाच्या वडिलांनी केलेला आहे. या छळाला कंटाळूनच ऋतुजाने आत्महत्या केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा 7 महिन्यांची गर्भवती होती. या संपूर्ण प्रकरणी ऋतुजाचा पती रुकुमार राजगे, सासू अल्का राजगे आणि सासरे सुरेश राजगे यांना अटक करण्यात आली आहे.










































