‘धर्मवीर-2’ अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा; संजय राऊत ‘त्या’ सीनवर आक्रमक

0
96

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर-2 हा सिनेमा आला आहे. या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चित्रपटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. धर्मवीर-2 हा अत्यंत बोगस सिनेमा आहे. हा काल्पनिक सिनेमा असून त्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या सिनेमातील एका दृश्यावर तर संजय राऊत हे प्रचंड संतापले आहेत. आनंद दिघे यांचं पार्थिव एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत, त्यावरच संजय राऊत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

जसजश्या निवडणुका येतील तस तसे धर्मवीर 1, 2, 3, 4, 5 येतील. धर्मवीरांना आम्ही चांगलं ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी 2005 साली पक्ष सोडला. ज्यांनी 2005 ला पक्ष सोडला. त्यांच्याबाबत 2001 रोजी स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे हा. काल्पनिक सिनेमा आहे. काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवून एक प्रकारे दिघे साहेबांचं चारित्र्य हनन केलं आहे. काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला. मी कुठे तरी होतो. मी पाहिला. आणि धक्काच बसला, असं संजय राऊत म्हणाले.

दिघे साहेबांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर दिघेसाहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री दवाखान्यातून उतरताना दाखवले आहेत. तुम्ही पाहा ते सिनेमातील दृश्य. दिघे साहेबांची डेडबॉडी खांद्यावर टाकून… दुसरा कोणी नव्हता तिथे. पार्थिव खांद्यावर घेऊन शिंदे पळत आहेत… कोणता सिनेमा आहे हा? कोण लिहितंय असं? हा दिघे साहेबांचा अपमान आहे. त्यांचे जे सर्व समर्थक आहेत, त्यांचाही अपमान आहे. अशा गोष्टी या सिनेमात आहेत. हा सिनेमा ऑस्करला पाठवा. हा ऑस्करचा सिनेमा आहे. एखादा ड्युप्लिकेट ऑस्कर लावा. पाचपाखाडीत एक ऑस्करचं ऑफिस टाका. किंवा ओवळा माजिवड्यात ऑफिस टाका. द्या ऑस्कर… दिघे साहेबांचे पार्थिव घेऊन शिंदे पळत आहेत. दिघे साहेबांचा हात लटकत आहे, हा दिघे साहेबांचा अपमान आहे. पैशाच्या लालचमध्ये कलाकार, लेखक सिनेमा करत आहेत. हा दिघे यांचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दिघे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने वापर केला जातोय. ते घृणास्पद, हस्यास्पद आणि लाजीरवाणं आहे. हा प्रचारपट नाही. हा दिघे यांचा अपप्रचार आहे. मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात पाहिला नाही. दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्यासमोर आहे. त्यांच्या अनेक गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे. त्यांच्या अनेक खटल्यात मी साक्षीदार आहे. त्यांच्या मृत्यूच्यावेळी आम्ही तिथे होतो. आम्हाला सर्व माहिती आहे. कोणी तिकीट काढून जाणार नाही. त्यामुळे फ्रि दाखवला जात आहे. खरंतर या सिनेमाचा सत्य आणि वास्तवतेशी काही संबंध नाही, अशी सिनेमात एक ओळ टाकली पाहिजे. कारण त्यात काही सत्यच नाही, असा हल्लाच राऊत यांनी लगावला.

धारावी बचाव आंदोलनाचे नेते आज संजय राऊत यांना भेटले. यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजू कोरडेंसह धारावीचे पदाधिकारी आम्हाला भेटले. धारावीची विधानसभा शिवसेनेने लढावी अशी त्यांची मागणी आहे. कारण हे आंदोलन शिवसेनेने जिवंत ठेवलंय. आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना करत आहे. त्यामुळे धारावीची विधानसभा शिवसेनेने लढावी अशी विनंती धारावी बचाव कृती समितीचे लोक करत आहेत. ते वारंवार आम्हाला भेटत आहेत. आज पुन्हा ते माझ्याकडे आले. त्यांची जी भूमिका आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालेल आणि काँग्रेस हायकमांडच्या कानावरही घालू, असं राऊत म्हणाले