धर्मरक्षणासाठी संभाजीराजे यांचे चरित्र अंगीकारले पाहिजे! – ॲड. उज्ज्वल निकम

0
2

पिंपरी, दि. २७ – ʼधर्मरक्षणासाठी संभाजीराजे यांचे चरित्र अंगीकारले पाहिजे!’ असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करताना ॲड. निकम बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरि शंकर जैन आणि विधिज्ञ ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना यंदाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी अनेक वर्षांपासून कायदेशीर संघर्ष करणारे ॲड. हरि शंकर जैन आणि ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना एक लक्ष रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पारितोषिक पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला; तर विदर्भ प्रांतात लव्ह जिहाद, कौटुंबिक हिंसाचार, नारी सुरक्षितता यासाठी सुमारे चौतीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या मीरा अ. कडबे यांना एकावन्न हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ॲड. हरि शंकर जैन उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समाजात रुजविण्याची गरज आहे. त्यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत!’ अशी भावना व्यक्त केली; तर ॲड. विष्णु शंकर जैन यांनी पुरस्काराला उत्तर देताना श्रीराम मंदिर आणि ज्ञानव्यापी या बहुचर्चित खटल्यांबाबत सविस्तर माहिती देऊन, ‘मंदिरांची पुनर्स्थापना हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचे कार्य आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे!’ अशी भावना व्यक्त केली.
मीरा कडबे यांनी २००७ पासून लव्ह जिहादच्या कार्याला सुरुवात झाली असे नमूद करीत, ‘माणुसकीच्या बाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे; पण लव्ह जिहादचे प्रकरण असेल तर मी कट्टर हिंदू रणरागिणी आहे!’ असे मत मांडले.
ॲड. उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, ‘कसाब हा दहशतवादी होता हे आमच्या शत्रूराष्ट्रानेही मान्य केले असले तरी काही बालबुद्धीचे विरोधक हे मान्य करायला तयार नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. जोपर्यंत पाल्यांशी मैत्रीपूर्ण सुसंवादाची भूमिका नसेल, तोपर्यंत लव्ह जिहाद होत राहतील. आत्मविश्वास हा संघर्ष करण्याचे बळ देतो. न्यायालयात फौजदारी स्वरूपाचे खटले मी लढवत असलो तरी हिंदुत्वाच्या कायदेशीर लढाईसाठी कटिबद्ध आहे!’

पारंपरिक तुतारी गर्जनेने आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सागर पाटील यांनी प्रास्ताविकातून, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे असामान्य धैर्य अन् प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेले कृतिशील विचारवंत होते. त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सतरा वर्षांपासून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात!’ अशी माहिती दिली.

सकाळच्या सत्रात सावरकर उद्यानातील स्वातंत्र्य सावरकरांच्या प्रतिमेला मंडळाच्या वतीने अभिवादन करीत व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी स्वातंत्र्य सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

ज्योती कानेटकर, उज्ज्वला केळकर आणि ॲड. हर्षदा पोरे
यांनी मान्यवरांचे परिचय करून दिले.
विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. विकास देशपांडे यांनी आभार मानले व स्नेहल देशपांडे यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सावरकर प्रेमी नागरिक व अनेक हिंदुत्ववादी संघटना/संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते