मुंबई, दि. ६ (पीसीबी) : शिवसेना आणि शिंदे गटाचा बहुचर्चित दसरा मेळावा मुंबईत सुरु असतानाच दिल्लीत निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण या चिन्हावर कोणाचा हक्क आहे, याबाबतचा निर्णय सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात प्रलंबित आहे. यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देऊ केली होती. त्यानुसार काल दसरा मेळावा सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी पुरावे घेऊन दिल्लीत निवडणूक आयोागच्या दारात पोहोचले होते. शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून येत्या काही तासांमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज वकिलांची भेट घेतली जाणार आहे. या बैठकीत निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचे, आणखी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले पाहिजेत, याबाबत खल होऊ शकतो. या सगळ्या कायदेशीर लढाईसाठी आणखी काही अवधी मिळावा अशी शिवसेनेची एकंदर भूमिका आहे. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये म्हणजे साधारण शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाऊ शकतो. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या नजरा लागल्या आहेत.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा अंदाज आहे. र्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना, घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे ३६० अंशांमध्ये बदलू शकतात