धनुर्विद्येचे दोन दिवसीय पंच – प्रशिक्षक शिबिर पुण्यात संपन्न.

0
83

बाणेर दि. ०१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड आर्चरी असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया द्वारा आयोजित सीएम स्कूल परिसरामध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील पंच आणि प्रशिक्षक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिरा दरम्यान सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींना धनुर्विद्या खेळाचे मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण, धनुर्विद्येचे स्पर्धा पंच व नियम, खेळ मानसिकता विकास, खेळाडूंना आवश्यक असलेले आहार तज्ञांचे मार्गदर्शन आधी विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातून सुमारे 60 शिबिरार्थींनी सहभाग घेतला.

शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी, धनुर्विद्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच सोनल बुंदेले, आहारतज्ञ पायल शहा आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या शिबिराबद्दल माहिती देताना मुख्य आयोजिका आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले म्हणाल्या, “धनुर्विद्या खेळाचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा, धनुर्विद्या खेळासाठी उत्तम तांत्रिक पाठबळ निर्माण व्हावे जेणे करून खेळाडूंना अधिकाधिक पूरक वातावरण निर्माण होईल आणि ऑलिंपिक गेम्स मध्ये भारताला आणि महाराष्ट्राला विशेष प्राविण्य मिळेल असे खेळाडू तयार होतील ह्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन मार्गदर्शकान साठी करण्यात आले.”

सदर शिबिराच्या समारोप समरंभा प्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव अभिजित दळवी, पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले आदी उपस्थित होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे म्हणाले, “या शिबिराचा सर्व पंच आणि नियोजित मार्गदर्शकाना जास्तीत जास्त खेळाडू तयार करण्यासाठी तसेच त्यांची प्रात्यक्षिक गुणवत्ता वाढविण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल”

या वेळी श्री.कसगावडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेग वेगळ्या योजनां बद्दल माहिती उपस्थितांना दिली.

सहभागी सर्व पंच प्रशिक्षक आणि नियोजित मार्गदर्शकाना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदर शिबिराचे आयोजन आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले यांनी केले.

शिबिरार्थींनी शिबिरात मिळालेल्या उपयोगी माहितीबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.