पुणे, दि. 6 (पीसीबी)
राज्यात संतोष देशमुख हत्याप्रकरणी वातावरण ढवळून निघालं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला असून भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं असून सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही या प्रकरणी आगपाखड केली. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे सर्वाधिक टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. दरम्यान, आता राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच, याप्रकरणी अजित पवारांनाही जाब विचारला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“बीड सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ही माणुसकीची हत्या आहे. आम्ही सर्व पक्षातील लोक राज्यपालांना भेटत आहोत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराडवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यावरून तो सहज बाहेर येऊ शकतो. त्यामुळे त्याच्याविरोधात ३०५ कलमांतर्गत कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “राज्यपालांना सांगू इच्छितो की या सगळ्याचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. लोकांचा आक्रोश असताना अंतुले, आर. आर. पाटील, मनोहर जोशी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. क्लीन चिट मिळाल्यानंतर ते पुन्हा त्या पदावर बसले होते. मग अजित पवार धनंजय मुंडे यांना संरक्षण का देत आहेत? असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.
मराठा विरुद्ध वंजारी विषय नाही
“राज्यपाल महोदयांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. ही माणुसकीची हत्या केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा हा महाराषट्र आहे. हा संताचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैवं आहे. हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जातीच्या मार्गावर गेला आहे. ते सुद्धा होऊ नये. हा मराठा विरुद्ध वंजारी विषय नाहीय. दलित समाजाच्या मुलाला संतोष देशमुख वाचवायला गेला होता. ही माणुसकीची हत्या आहे”, असा संतापही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.