धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र – श्री राहुल सोलापूरकर

0
190

निगडी, दि.26 (पीसीबी)- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र हे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा समान होते, त्यांच्या स्वदेश,स्वभाषा, स्वधर्म स्वनिष्ठा, या विचारांशी समर्पित होवून त्यप्रमाने आचरण केले गेले पाहिजे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे मत श्री राहुल सोलापूरकर यांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी, आयोजित, वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेचे उद्घाटक, आमदार श्री महेशदादा लांडगे, संस्थेचे उपकार्याध्यक्ष, डॉ. अरविंद पांडे, कार्यवाह,प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह,डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह श्री चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळ सदस्य,श्री दिपक मराठे उपस्थित होते.

वसंत व्याख्यानमाला वर्ष २९ वे मधील पाहिले पुष्प गुंफताना श्री राहुल सोलापूरकर यांनी सादर केलेल्या तब्बल दोन तासाच्या व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र सांगत उपस्थितांना त्यांनी खिळवून ठेवले होते.
उद्घाटनप्रसंगी मनोगतात श्री महेश लांडगे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व सावरकरांच्या विचारांना उजाळा दिला.

प्रास्ताविक पर भाषणात नियामक मंडळ सदस्या,सौ मृगजा कुलकर्णी यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष, डॉ गजानन एकबोटे सरांनी सुरू केलेल्या या व्याख्यानमालेचा उद्देश विषद केला व संस्थेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य श्रोत्यांपुढे मांडले.
श्री सोलापूरकर यांनी, व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपण, प्रचंड बुध्दीमत्ता, वाचन, बालवयातच काव्य साहित्य रचना,त्यांचे संघटन व कार्य यावर प्रकाश टाकला.

हुतात्मा चाफेकर बंधूंचे बलिदान व काळकर्ते शिवराम हरी परांजपे यांचे कडून प्रेरणा घेवून सावरकरांनी स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात समर्पित केले होते. सशस्त्र क्रांतीची शपथ घेवून त्यांनी पुढे अभिनव भारत संघटना माध्यमातून कार्य सुरू केले होते. पुढे त्यांनी सावरकरांचे साहित्य विषयक कार्याबद्दल बोलताना कमला काव्य, मझिनीचे चरित्र, शिखांचा इतिहास, १८५७ चे स्वातंत्र्य समर, तसेच, नाट्य कलाकृती यावर भाष्य केले तर सागरा प्राण तळमळला व प्रभाकरास ह्या कविता विषयी माहिती दिली.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ सर्वार्थाने प्रेरणादायी ठरला, तसेच त्यांची बोटीतून प्रसिद्ध उडी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक ठरले. केवळ देशप्रेमासाठी सावरकरांनी अंदमानात अत्यंत हाल अपेष्टा सहन करत एवढे दिवस काळकोठडीत काढले असतील ही कल्पना ही करवत नाही.असे ते म्हणाले.

राजकीय स्वातंत्र्याचा लढा समाज सुधारणेशिवाय अपूर्ण आहे हे सावरकरांनी अंदमानात असतानाच हेरले होते, वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, शुध्दी बंदी, रोटी बंदी व बेटी बंदी या सात बेड्यांमुळे निर्माण झालेल्या अनिष्ट प्रथा तोडण्याचा आग्रह त्यांनी धरला, यासाठी सर्व जातींसाठी सहभोजन असे कार्यक्रम,प्रथम अंदमानात व नंतर स्थानबद्धेत असताना रत्नागिरीला त्यांनी केले होते.

पुढे ते म्हणाले की सावरकर हे एक थोर समानतावादी, समाजसुधारक, साहित्यिक, भाषा शुध्दी लिपी शुध्दी चळवळीचे प्रणेते होते, त्यांनी २६३६ मराठी शब्द प्रचलित करून स्वभाषा समृध्द केलेली आहे. ते हिंदू तत्वज्ञ म्हणून सर्वसमावेशक हिंदुत्व भूमिका मांडणारे होते.

आयुष्याच्या शेवटच्या टोकावर असतानाही आपल्या मातृभाषेबद्दल दुर्दम्य आशावाद असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते, समाज प्रबोधनासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले अशा विचार स्मृतीला अभिवादन करून राष्ट्र निर्माण साठी सर्वांनी भागीदार व्हावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रारंभी इशस्तवन प्रा. निकिता गायकवाड यांनी सादर केले, सूत्र संचालन प्रा. रोहित गुरव, तर मान्यवरांचा परिचय श्री प्रशांत कुलकर्णी,सौ वंदना पांडे, यांनी करवून दिला तसेच सौ लिना पगारे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. या व्याख्यानमालेसाठी कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे यांचे मार्गदर्शन लाभले तर संयोजन मॉडर्न संकुलातील पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर यांनी केलेले आहे .