धक्कादायक । मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा धावत्या बसमध्येचं काटा काढला

0
84

कोल्हापूर, दि. 27 (पीसीबी) : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर मुलीला वारंवार त्रास देत असणाऱ्या जावयाचा सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटी बसमध्येच गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि मृत तरुणाच्या सासू-सासऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४९) आणि सासू गौरा हणमंताप्पा काळे (वय ४५) या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही आरोपी बेळगाव जिल्ह्यातील नायनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांना कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तपासणी केल्यानंतर या तरुणाच्या गळ्यावर पोलिसांना दोरीचे व्रण दिसून आले. तेव्हा या तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. मृताच्या खिशामध्ये एक डायरी आणि काही चाव्या आढळून आल्या आहेत. या डायरीत संदीप असे नाव लिहलं होते. तसेच पत्नीचा मोबाइल क्रमांक देखील नमूद होता. पोलिसांनी संदीपच्या पत्नीला घटनेची माहिती दिली आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणला.

मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा त्यांना एक महिला आणि पुरुष बसस्थाकनाच्या बेंचवर काहीतरी ठेवताना दिसून आले. पोलिसांनी या दोन व्यक्तींचा शोध घेतला असता, ते मृत तरुणाचे सासू-सासरे निघाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मुलीचा विवाह संदीपसोबत झाला होता. दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला सातत्याने त्रास द्यायचा त्यामुळे दोघांचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर संदीपची पत्नी आपल्या माहेरी राहत होती. ४ दिवसांपूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला. तेथे सासू-सासऱ्यांनी त्याची समजूत घातली. परंतु, यावेळी संदीप आणि सासू सासऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.

संदीप ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नसल्याने दोघांनीही त्याला कोल्हापुरात सोडून येतो, असे मुलीला सांगितले. आरोपींनी गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवासाची एस. टी. तिकिटे काढली. प्रवासात संदीप आणि आरोपींचा पुन्हा वाद झाला. या वादातून त्यांनी संदीपचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब अशी की, बसमधील इतर प्रवाशांना याचा मागमूसही लागला नाही. दरम्यान, एसटी बस स्थानकावर पोहचल्यानंतर मुलगा आजारी आहे,, असं सांगून त्यांनी संदीपचा मृतदेह एका बेंचवर ठेवला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.