धक्कादायक – महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न

0
110

दि ६ जुलै (पीसीबी ) पुणे : वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला.

अटकेत असलेला आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय आल्यानं त्याला ब्रीद एनालायझर टेस्टसाठी विश्रामबाग कार्यालयात आणलं गेलं. त्यावेळी त्यांना संबंधित पोलिसांशी वाद घालून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. एपीआय जानकर सावंत यांच्यासोबत हा प्रकार घडला. सुदैवानं आरोपीच्या हातातला लायटर पेटू न शकल्यानं पुढील दुर्घटना टळली.

आरोपीनं ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतलं त्या महिला पोलीस अधिकारी शैलेजा स्वरूप जानकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या म्हणाल्या की, “आरोपीला याच चौकात पकडण्यात आलं होतं. तो फार गोंधळ घातल होता. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह चेकिंग करताना आरोपीला पकडण्यात आलं होतं. पोलीस स्थानक जवळच असल्यामुळे त्याला चेकिंग करण्यासाठी तिथे नेण्यात आलं. त्यावेळी एक पोलीस अधिकारी त्याचं चेकींग करत होते. त्यावेळी त्यानं थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तो कार्यालयातून बाहेर गेला आणि पेट्रोलचा डब्बा घेऊन आला. चेकींग करत असलेल्या पोलिसाच्या अंगावर तो पेट्रोल टाकू लागला. त्यावेळी त्याला थांबवण्यासाठी मी मध्ये पडले. त्यानं माझ्याही अंगावर पेट्रोल टाकलं. संध्याकाळी साधारणतः 7 वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला.”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ बोलताना म्हणाल्या की, “शुक्रवारी संध्याकाळी ट्रॅफिक ब्रांचकडून बुधवार चौकात कारवाई सुरू होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन जात असताना पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवलं. त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सर्वांना आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि पुढच्या कारवाईसाठी पोलीस स्थानकात आणलं. त्यानंतर पोलिसांनी मशिननं त्याची अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी त्याला मशीनमध्ये फुंकर मारण्यास सांगितली. पण आरोपी टाळाटाळ करू लागला. आरोपीनं पोलीस स्थानकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला शांत करण्यासाठी थोडा वेळ थांबण्यासाठी सांगितलं. तेवढ्या वेळात तो तिथून पळून गेला आणि एका छोट्या बाटलीत पेट्रोल आणि लायटर घेऊन आला. त्यानंतर जे कर्मचारी तपासणी करत होते. त्यांच्यावर त्यानं पेट्रोल ओतलं आणि पेटवण्याचा प्रयत्न केला.”