कोल्हापुर, दि. १८ (पीसीबी) – प्रसिद्ध मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (शनिवार, 18 मार्च) रोजी कोल्हापुरात दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी सिनेमांत अजरामर भुमिका साकारुन महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. भूमिका कोणतीही असली तरीही ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. पिंजरा, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, थरथराट, जावयाची जात, धुमधडाका अशा तब्बल 300 हून अधिक सिनेमात भालचंद्र कुलकर्णी यांनी काम केले होते. कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते काही वर्षे सचिव तर काही वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी 6 वाजता निधन झाले असून दुपारी 12 वाजता कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.