धक्कादायक! बुलढाण्यात केस गळतीच्या संकटानंतर आता रुग्णांच्या नखाचीच गळती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

0
55

दि . १७ ( पीसीबी ) बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही महिन्यापासून केस गळतीने नागरिक हैराण झाले असताना आता या प्रकरणाला गंभीर वळण लागल आहे. केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखांची गळती सुरू झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले आहेत.अचानक झालेल्या केस गळती प्रकरणाने आरोग्य प्रशासनही ढवळून निघालं आहे. आता या केस गळतीच्या संकटानंतर रुग्णांची नखे कमजोर होऊन विद्रूप झालेली नखे गळून पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आयसीएमआरच्या पथकाने डिसेंबर महिन्यापासून परिसरातील केस गळती रुग्णांचे व परिसरातील इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी नेले.मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दोनहून अधिक महिने उलटूनही आयसीएमआरचा अहवाल उघड न झाल्यामुळे सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे.