धक्कादायक – बातम्यांची सर्वात जुने UNI कार्यालय बंद

0
4

दि.२२(पीसीबी)-शुक्रवारीच दिल्ली उच्च न्यायालयाने, माध्यम संस्थांसाठी संयुक्त कार्यालय संकुल विकसित करण्यासाठी UNI ला देण्यात आलेल्या सरकारी जमिनीचे वाटप रद्द करण्याच्या भूमी आणि विकास कार्यालयाच्या निर्णयाला कायम ठेवले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी काही वकील आणि दिल्ली पोलीस मोठ्या फौजफाट्यासह त्या संकुलात पोहोचले. UNI कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने पोलीस असून ते पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यालये रिकामी करण्यास सांगत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

UNI ने असा आरोप केला आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आणि अनेकांना त्यांच्या वैयक्तिक वस्तू घेण्यापासून रोखण्यात आले. तसेच, या काळात कर्मचाऱ्यांवर अत्याचारही करण्यात आले, असाही त्यांचा आरोप आहे.
नवी दिल्लीचे पोलीस उपआयुक्त सचिन शर्मा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कार्यालय रिकामे करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले आणि संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आल्याने काहीही गैरप्रकार घडला नाही.

“देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे कार्यालय सील केल्याने, पत्रकार स्वातंत्र्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे,” असे UNI ने X वर लिहिले .
UNI ने आपल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने पोलीस दिसत असून, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.