धक्कादायक , पिंपरीत फक्त १० टक्के इमारतींना अग्निशमनचे दाखले

0
225

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३० हजार २४६ आस्थापनांची पाहणी केली. त्यातील केवळ तीन हजार ३६३ आस्थापनांकडेच अग्निशमन विभागाचा सुरक्षा दाखला असल्याचे समोर आले. दाखला नसलेल्या २७ हजार १५६ आस्थापनांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

चिखलीतील हार्डवेअरच्या दुकानास ३० ऑगस्ट रोजी आग लागली होती. या आगीत दुकानातील पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना शहरात घडू नयेत यासाठी महापालिकेने व्यावसायिक गाळ्याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले. महिला बचतगटांमार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे. शहरात ९० हजारांहून अधिक व्यावसायिक आस्थापना आहेत. आतापर्यंत ३० हजार २४६ आस्थापना, गाळ्यांचे महिलांनी सर्वेक्षण केले.

उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून अग्निशमन यंत्रणा उपलब्धता, मालमत्तांचे छायाचित्रे, विविध परवान्यांची माहिती संकलित केली जात आहे. ३० हजारपैकी केवळ १५६ व्यावसायिकांनी अग्निशमन विभागाचा दाखला घेतला आहे. तर, २९ जणांनी परवान्याचे वार्षिक नूतनीकरण केले आहे. १७७ जणांकडे सुरक्षा दाखला आहे. दोन हजार ७२८ जणांनी सुरक्षा साधने वापरली आहेत. तर, केवळ २७३ जणांकडे व्यवसाय परवाना आहे. तीन हजार ३६३ आस्थापनांकडे अग्निशम विभागाचा परवाना आहे. तर, २६ हजार ८८३ जणांकडे कोणताच परवाना नसल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे