धक्कादायक ! पार्टीसाठी फ्लॅटवर बोलावले; ड्रगचे सेवन करून मुलीवर चौघांकडून अत्याचार

0
95

पुणे, दि. 27 (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील एक अत्याचाराची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी आरोपींवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या एका महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेत आहे. तर त्याच महाविद्यालयात चारही आरोपी 11वी व 12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यावेळी त्यातील एका आरोपीने पीडित मुलीला पार्टीसाठी म्हणून फ्लॅटवर नेले. मात्र तिथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडित मुलीवर अत्याचार केला.

या संपूर्ण घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर यासंदर्भात प्राथमिक माहिती समोर आली. या संपूर्ण घटने नंतर पीडितेच्या कुटुंबानी या आरोपींविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाविद्यालयीन तरुणांची सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर पीडित महाविद्यालयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच आता कोरेगाव पार्क पोलिसांनी या धक्कादायक घटने प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक देखील केली असून यामधील दोन तरुण हे अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.