धक्कादायक! नवऱ्यासोबत मंदिरात गेलेल्या नवविवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार

0
97

मध्यप्रदेश, दि. 26 (पीसीबी) : नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर मंदिरात आणि तिथून पुढे फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यात हा प्रसंग घडला असल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. “सदर दाम्पत्य २१ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून रेवा येथील एका मंदिरात आले होते. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या एका स्पॉटवर ते भटकंती करायला गेले. तिथेच आरोपी पार्टी करत होते. आरोपींनी आधी दाम्पत्याशी ओळख केली. त्यानंतर त्यांनी नवऱ्याला मारहाण करत पत्नीपासून वेगळे केले आणि मग सामूहिक बलात्कार केला”, अशी माहिती रेवाचे पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी दिली.

हे कृत्य करत असताना आरोपींनी सदर नवविवाहितेचा व्हिडीओही बनवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जर या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर सदर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे. या धमकीमुळे पीडित दाम्पत्य पुढे यायला घाबरत होते. मात्र दुसर्‍या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल केला. पीडितेने सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी चार ते पाच आरोपी होते. मात्र आमच्या तपासात त्याहून अधिक लोक या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय आहे. काही लोकांनी या आरोपींना मदत केली होती, अशी शक्यता पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. पाच अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविवाहित दाम्पत्याने रेवा येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिथूनच दोन किलोमीटरवर असलेल्या एका सहलीच्या पॉईंटला भेट दिली होती. दरम्यान आरोपी या घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होते. घटनास्थळावरून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हे रेवा जिल्ह्यातीलच असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पाच आरोपींच्या हातावर आणि छातीवर टॅटू होते. या माहितीचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.