धक्कादायक! देहविक्री करण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने वार!

0
177

मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्या मानेवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) सायंकाळी सहा ते सोमवार (दि.27) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान गोडुंब्रे येथील पवना नदीच्या पुलावर घडला आहे. याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याप्रकरणी 16 वर्षाच्या पिडीत मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पवनकुमार आयोध्या प्रसाद (वय-23 मुळ रा. रामपुर बेला, ता. पट्टी जी. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), अंजू गोबरी यादव (वय-39), दिपक गोबरी यादव (वय-21 दोघे मुळ मुळ रा. फतेहपुर भटौली, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी पिडीतेशी प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर पवनकुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देहविक्रीची मागणी केली. यावेळी पिडीतेने त्यांना देहविक्रीसाठी नकार दिला. तिला मूळगावी सोडण्याचा बहाणा करून तिला दुचाकीवर घेऊन जात महिला आरोपीच्या भाड्याच्या खोलीत तिला ठेवले.

त्यानंतर पवनकुमार याने सोमवारी सायंकाळी त्याच्या दुचाकीवरुन गोडुंब्रे येथील पवना नदीच्या लहान पुलावर घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपी अंजू हिने अंधारात मुलीच्या मानेवर चाकूने वार केला, तसेच गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.