धक्कादायक ! कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
88

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता विरारमध्ये 22 वर्षीय तरुणीवर कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप उपजिल्हाध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं भाजप वसई-विरार उपजिल्हाध्याचं नाव आहे. तसेच तो उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी आहे. त्याच्यासोबत नवीन सिंग आणि त्याची पत्नी अशा तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गंगेश्वरलाल श्रीवास्तव याने पीडित महिलेला कामाचे पैसे देतो असे सांगून एका इमारतीमध्ये बोलावून घेतले. तिथे आल्यावर तिला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे त्यावेळी नवीन सिंग याची पत्नीने या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ तयार केला. नवीन सिंग याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेशी जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून तिला गरोदर केल्याचा आरोप आहे. तसेच यासंदर्भात तक्रार करु नये म्हणून फिर्यादी यांच्याशी लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीसोबत वारंवार शरीरसंबंध ठेऊन तिला दोन वेळा तिचा गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

याबरोबरच पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसर, आरोपी नवीन सिंग याच्यापासून 29 एप्रिल 2024 रोजी महिलेने एका मुलीला जन्म दिला. आता पुन्हा ती एक महिन्याची गरोदर आहे. नवीन सिंग आता पीडिता आणि तिच्या मुलीचा सांभाळ करण्यास नकार देत आहे. शिवाय नवीन सिंग याची पत्नी सतत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही पीडित महिलेने यावेळी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी तिघांवर पीडित महिलेला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळत महिलेला बेशुद्ध करून सामूहिक बलात्कार केल्याचा, तसेच तिचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत सतत बलात्कार केल्याचा आरोपासह इतर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपी संजु श्रीवास्तव, नवीन सिंग आणि नवीन सिंग याची पत्नी या तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.