धक्कादायक… काश्मीरमध्ये चार वर्षांत ७०० तरुण दहशतवादी संघटनेत

0
232

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती करण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या केंद्रशासित प्रदेशात १४१ सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बहुतेक दहशतवादी परदेशी असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी आणि ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते. हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत. विविध दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमधील ७०० स्थानिक तरुणांची भरती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये १८७, २०१९ मध्ये १२१, २०२० मध्ये १८१ आणि २०२१ मध्ये १४२ तरुणांची भरती करण्यात आली होती. या वर्षी जून अखेरपर्यंत ६९ तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत ५५ चकमकीत १२५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये २० नागरिकांचाही बळी गेला आहे. यासोबतच या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून यामध्ये ४१ नागरिकांना आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला होता. गेल्या वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण ६३ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.