द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ..! 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्यास तयार

0
347

मुंबई, दि. ११ मे (पीसीबी) – सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करतोय. पहिल्या वीकेंडनंतरही चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ पहायला मिळतेय. कमाईचा वेग पाहता दुसऱ्या वीकेंडपर्यंत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. या चित्रपटाच्या यशाचं श्रेय कथेला आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाला मिळतंय. प्रदर्शनाआधीपासूनच त्याची जोरदार माऊथ पब्लिसिटी केली जातेय. म्हणूनच प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीसुद्धा चित्रपटाने डबल डिजिटमध्ये कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मंगळवारच्या कमाईपेक्षा बुधवारच्या कमाईत 10 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. या चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत जवळपास 69 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी आणल्यानंतरही कमाईवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ‘द केरळ स्टोरी’च्या कमाईचे आकडे पाहून असं म्हटलं जात आहे की हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या पावलांवर पाऊल टाकत आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ होत असून दुसऱ्या वीकेंडलाही बंपर कमाईची अपेक्षा केली जात आहे.

द केरळ स्टोरीची कमाई

शुक्रवार- 8.03 कोटी रुपये
शनिवार- 11.22 कोटी रुपये
रविवार- 16.40 कोटी रुपये
सोमवार – 10.07 कोटी रुपये
मंगळवार- 11.14 कोटी रुपये
बुधवार- 12 कोटी रुपये
एकूण- 68.86 कोटी रुपये

या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.

केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत