नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) : ‘पं. मोतीलाल नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेस नेहमीच शोषित, वंचित आणि आदिवासींच्या पाठीशी उभी राहिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला उमेदवाराला विरोध करणे माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. पक्षश्रेष्ठींनी याचा फेरविचार करावा’, असे ट्विट आचार्य प्रमोद कृष्णम यांनी करून काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.
विरोधकांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले यशवंत सिन्हा यांचा पाठिंबा काढून घेण्याचे आवाहन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला केले आहे. प्रमोद कृष्णम यांच्या ट्विटवर आतापर्यंत कोणत्याही काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांना कठोर हल्ल्याला सामोरे जावे लागू शकते, असे मानले जात आहे. यापूर्वी कन्हैयालाल हत्याकांडातही त्यांनी राजस्थान पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्याच सरकारला घेरल्याने त्यांना काँग्रेस नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.