द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर, पण `मातोश्री` वर जाणार नाहीत

0
232

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. सध्या देशातील राजकारणाकडे लक्ष लागले असून येत्या १८ जुलैला मतदान तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुबंईत येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवेसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू याही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का हे पहावे लागणार आहे. कारण आज त्या मुंबई दौऱ्यावर असल्या तरी ठाकरेंशी त्यांच्या कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर असून त्या तीनच्या सुमारास विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर पाचनंतर त्या पुन्हा दिल्लीकडे होणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मुर्मू मातोश्रीवर जाणार का हे पहावं लागणार आहे. दोन ते अडीच तासांचा या कालावधीत मुर्मू जाणार का नाही असे सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांसोबत प्रचाराचे एक भाषण करुन त्या पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.