पिंपरी,दि.१३(पीसीबी) – हाफकिन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली राज्य शासनांतर्गत कार्यरत संस्था आहे. या संस्थेकडून विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते. या लसींना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तेथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री झिरवाळ बोलत होते. या वेळी हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप धिवर, व्यवस्थापक नवनाथ गर्जे, पिंपरी-चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुहे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त गिरीश हुकरे, सहायक आयुक्त कोंडीबा गाडेवार, माजी महापौर योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.पिंपरी चिंचवड पर्यटन
मंत्री झिरवाळ यांनी प्रतिविष उत्पादन, गुणवत्ता आश्वासन, उत्पादन, पशुवैद्यकीय विभाग, कर्मचारी निवासस्थान, तबेला, सर्पालय यांना भेट देत संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली.
या प्रसंगी महिंद्रकर यांनी मुंबई केंद्राविषयी तर डॉ. कुहे यांनी पिंपरी-चिंचवड संस्थेच्या जागा, मनुष्यबळ, कर्मचारी निवासस्थान, उपलब्ध साधनसामुग्री आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली. तसेच संस्थेच्या वतीने उत्पादित सर्पदंश, विंचूदंश, घटसर्प, श्वानदंश, गॅस गँगरीन प्रतिविष, प्रतिधनुर्वात, पोलिओ लस उत्पादन, साठवणूक क्षमता आणि त्यातून जमा होणाऱ्या महसुलीबाबत पीपीटीद्वारे सविस्तर माहिती सादर करण्यात आली