दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई – फडणवीस

0
33

मुंबई, दि. ३१ –
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज ज्यांच्यावर विरोधक आरोप करत होते, त्या वाल्मिक कराड यांनी पुणे सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. त्यानंतर या प्रकणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलत असताना फडणवीस म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील.”

गुंडांचे राज्य चालू देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपासाला गती दिली असून त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली. आता हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढले जाईल.

आजच स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यांनाही मी आश्वस्त केले आहे. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील, हा विश्वास त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आरोपींवर कोणता गुन्हा दाखल होईल आणि कसा होईल? याची माहिती पोलीस देतील. जे जे पुरावे आहेत, त्याच्या आधारावर कुणालाही सोडणार नाही, हे मी सांगतो. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे देण्यात आली असून त्यांना पूर्ण स्वायत्ता देण्यात आली आहे. कुणाचाही दबाव त्यांच्यावर राहणार नाही, तसेच कोणताही दबाव चालून घेतला जाणार नाही”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले…
कॅबिनेट मंत्र धनंजय मुंडे यांच्या राजकारणाच्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या प्रकरणातील राजकारणावर जायचे नाही. मी आधीपासून सांगत आलो आहे की, जे पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. माझ्याकरिता स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ. मला कुठल्याही राजकारणात जायचे नाही. त्यांनी त्यांचे राजकारण करत राहावे.