अमरावती, दि. २३ (पीसीबी) – गेल्या कित्येक दिवसांपासून शालेय स्टुडंट पोर्टल ही साईट दोषयुक्त व मंदगतीने सुरु आहे. या साईटवर सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड करावयाचे असून या व्हॅलिडेशनवर कित्येक शाळांचे अनुदान व संचमान्यता अवलंबून आहे. मागे काही दिवस ही साईट बंद होती. त्यानंतर सुरु झाली परंतु स्पीड अतिशय कमी असल्याने व मधेमधे वारंवार व्यत्यय येऊन परत परत लॉगिन करावे लागत असल्याने व परत लॉगिन करायला 10 मिनिट प्रत्येक वेळी द्यावे लागत असल्याने शाळांचा या साईट वर काम करण्यास खुप वेळ वाया जात असून भयंकर प्रमाणात अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
आता परत दिनांक २१ मार्च ला दुपारी ही साईट बंद झाली आहे. रात्रंदिवस बसून सुद्धा कोणतेही काम होत नसल्याने व एकावेळी एकच लॉगिन होत असल्याने याचा कामाच्या गतीवर सुद्धा परिणाम होत आहे. यामुळे साईटवर काम करणारी मंडळी व सर्व मुख्याध्यापक हे अतिशय त्रस्त झाले आहेत. वरून वरिष्ठ अधिकारी यांचे कडून त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश येत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांचे मानसिक स्वास्थावर परिणाम होत आहे. तरी वरिष्ठांनी आधी साईट पूर्णतः दुरुस्त करून मुख्याध्यापकांना काम करण्यास थोडा अवधी द्यावा, अशी मागणी सर्व मुख्याध्यापक वर्ग करीत आहेत. आता साईट दुरुस्तीकडे सर्व मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संचमान्यता करण्यासाठी विद्यार्थी सरल पोर्टल वरील आधार अपडेट करण्याकरिता मिसमॅच व इनव्हॅलिड हा विषय पर्यवेक्षणीय यंत्रणेमार्फत तपासुन एकदाचा आधार अपडेट कार्यक्रम संपविण्यात यावा. याकरिता ऑनलाईन संचमान्यता रद्द करण्यात येऊन पुर्वीप्रमाणे ऑफलाईन संचमान्यता करण्यात यावी. असे मत अमरावती जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शाळा मख्याध्यापक ललित चौधरी यांनी व्यक्त केले आहे.