दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तरुणाचा मृत्यू

0
175

मंगळवारी (दि.14) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका 77 वर्षीय नागरिकासह एका तरुणाचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी चाकण व एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मोशी येथे झालेल्या अपघातात सिताराम खत्रुजी उईके (वय 77 रा.मोशी) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रवींद्र सिताराम उईके (वय 41 रा. बोपखेल) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक परेश सोमाभाई पटेल (वय 45 रा गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम उईके हे पायी चालत जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर वेगाने चालवून फिर्यादीच्या वडिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेमध्ये वडिलांचे डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

तर चाकण येथील तळेगाव चौकात झालेल्या अपघातात किसन राजाराम काळे (वय 35 रा पिंपरखेड बीड) याचा मृत्यू झाला आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात मच्छिंद्र अंकुश गवळी (वय 36 रा. आळंदी) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रक चालक धर्मराज दगडू बचाटे (वय 35 रा खरपुडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेले माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक वेगाने चालवून किसन काळे याला पाठीमागून धडक दिली या अपघातात काळे हा गंभीर जखमी झाला व त्याचा यात मृत्यू झाला यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.