दोन मेंदू मृत (ब्रेनडेड) रुग्णांच्या अवयवदानामुळे सात तासाच्या आत तिघांना मिळाले नवजीवन.

0
252

– पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी.

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – सोलापूर येथील रुग्णालयात ५६ वर्षीय रुग्ण रास्ता अपघातात गंभीररित्या जखमी झाले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते तसेच पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात २५ वर्षीय तरुणाला मेंदू मध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला मेंदू मृत (ब्रेन डेड) म्हणून घोषित करण्यात आले होते. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार या दोन्ही रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले व त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटुंबावरील असाह्य दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णयामुळे तिघांना नवजीवन मिळाले.

या दोन्ही मेंदू मृत (ब्रेनडेड) रुग्णाच्या अवयवदानामुळे अवघ्या सात तासांमध्ये या तिन्ही रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र यांच्या प्रतीक्षा यादी प्रमाणे अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये ६१ वर्षीय महिला तर ६३ वर्षीय पुरुष रुग्णास यकृत तसेच ४० वर्षीय पुरुष रुग्णास मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.

अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या तिन्ही रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत झाली. रुग्णांना नवसंजीवनी देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. ग्रीन कॉरिडॉर द्वारे सोलापुरातून पिंपरी पर्यंत आणण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली
प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. शरणकुमार नरुटे, डॉ. आदित्य दाते, डॉ. मनोज डोंगरे, गॅस्ट्रो सर्जन डॉ. विद्याचंद गांधी, मूत्रपिंड विकार तज्ञ् डॉ. तुषार दिघे, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. व्ही. पी. साबळे वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता, कॉर्पोरेट विभागाचे संचालक, वैद्यकीय अधीक्षक यांचे अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत मोलाचे योगदान लाभले.

डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ.भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ.यशराज पाटील यांनी अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील सर्वांचे कौतुक केले”अवयवदान विषयी विविध माध्यमातून जनजागृती होत आहे. जनसामान्यांना यांचे महत्व पटले आहे याचेच हे फलित आहे. अश्या गंभीर परिस्थिती दोन्ही अवयवदात्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा धाडसी निर्णय आहे त्यांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत” अशी भावना प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केली.