दोन महिन्यात दोन कोटी ४४ लाख रुपये दंडाची वसुली

0
300

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने दोन महिन्यात दोन कोटी ४४ लाख ८८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. याबाबत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तर हिंजवडी, तळवडे ही आयटी क्षेत्रे आहेत. इथे काम करणारा कामगारवर्ग तसेच शहरातील इतर नागरिक मोठ्या प्रमाणात खासगी वाहने वापरतात. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नलचे नियम न पाळणे, वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा बसवणे, लायसन्स व इतर कागदपत्रे न बाळगणे अशा विविध नियमांचे वाहन चालक उल्लंघन करतात. वाहतूक विभागाकडून ई-चलन प्रणाली वापरली जात आहे. वाहन चालकांशी हुज्जत न घालता वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलन कारवाई करतात. तसेच चौकाचौकांमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील कारवाई केली जाते.

वाहनांवर झालेले ई-चलन भरण्यासाठी बहुतांश वाहन चालक टाळाटाळ करतात. त्यामुळे दंडाची भलीमोठी रक्कम अनपेड राहते. हा दंड वसूल करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दररोज विशेष नाकाबंदी मोहीम राबवून दंड वसूल केला.

जानेवारी महिन्यात एक कोटी दोन लाख २९ हजार ८४० रुपये तर फेब्रुवारी महिन्यात एक कोटी ४२ लाख ५८ हजार ७५० रुपये असा एकूण दोन कोटी ४४ लाख ८८ हजार ६०० रुपये दंड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमेत वसूल केला आहे.