दोन महिने वकिलांना काळा कोट वापरण्यापासून सूट

0
110

कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी (१६ एप्रिल) वकिलांनी परिधान करावयाच्या कपड्यांविषयी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, उर्वरित एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये जि ल्हा व सत्र न्यायालयामधील वकिलांना कार्यवाहीदरम्यान काळा कोट वापरण्यापासून सूट देण्यात आली आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये वकिलांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

हे परिपत्रक पहिल्यांदाच जारी झालेले नाही. यापूर्वीही उन्हाळ्याच्यादरम्यान अशी परिपत्रके निघाली आहेत. त्यामुळे अधीनस्थ न्यायव्यवस्थेत वकिली करणाऱ्या वकिलांसाठी ड्रेस कोडबाबतच्या अशा सूचना आणि परिपत्रके निघणे ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये ड्रेस कोडची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते. त्यांना अशा प्रकारची सूट आजवर सर्रासपणे देण्यात आलेली नाही. त्यांना त्यांच्या ड्रेस कोडचे पालन कटाक्षाने करावेच लागते. असे असले तरीही काही अपवादात्मक प्रसंगी मात्र हे नियम शिथिल केले गेले आहेत. तसेच काहीवेळा याचिका दाखल करून वकिलांचा ड्रेस कोड बदलण्यासाठीचे प्रयत्नदेखील केले गेले आहेत.